विजापूर – जिला पकडून देण्यासाठी छत्तीसगड पोलिसांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते त्या महिला नक्षलवाद्यांने आज पोलिसांपुढे शरणांगती पत्करली आहे. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आपल्या मुलीसोबत घरी परतण्यासाठी तिने आत्मसमर्पण केले आहे, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.
सोमली सोडी उर्फ वनिता (32) असे तिचे नाव आहे. 2003 पासून ती नक्षलवाद्यांच्या प्रतिबंधित संघटनेत काम करत होती. आणि 2018 पासून ती या संघटनेच्या नगरम पथकाची कमांडर म्हणून काम करीत होती.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात, विजापूरच्या मूळ रहिवासी असलेल्या या नक्षलवादी महिलेने माओवादी विचारसरणीतील पोकळपणा लक्षात आल्याने शरणांगती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले आहे.
या संघटनेत आपल्याला अविवेकी वागणूक दिली जात होती, तसेच छळ केला जात होता. यामुळे आपण ही चळवळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही या महिलेने सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.