पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यातील एका गावातील वृद्ध दाम्पत्याच्या घरातून झालेली सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणून पाचगणी पोलीसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. अधिक माहिती अशी की, या गावातील शेतामध्ये राहणाऱ्या वृद्ध दांपत्याच्या घराचे कुलुप तेथे ठेवलेल्या चावीने उघडून अज्ञात चोरटयाने दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 6 च्यादरम्यान त्यांच्या घरातील पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाची चेन व तीन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र व चांदीच्या पट्ट्या, कानातील फुले असे दागिने चोरले होते. याबाबत तक्रार आल्यानंतर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
यातील फिर्यादी वयोवृद्ध असल्याने गुन्हयाचा तपास कसोशीने करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाचगणी पोलिसांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार प्रभारी अधिकारी राजेश माने यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती सोमदे वरूडे, अंमलदार रवींद्र कदम, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे यांचे तपास पथक तयार केले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास करण्यात आला. ही चोरी माहितीच्या माणसांने केली असावी, असे लक्षात आल्याने पोलिस पथकाने तपासाची दिशा फिर्यादीच्या कुटुंबातील नातेवाइकांकडे वळवली.
घरफोडीतील दागिने पुण्यात विक्री झाल्याबाबत माहिती मिळाल्याने तपासले असता हे सोन्याचे दागिने फिर्यादीच्या विधीसंघर्षग्रस्त नातीने चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकरीता चोरी करून चोरीचे दागिने तिचा विधीसंघर्षग्रस्त मित्र व त्याच्या आईचे ओळखीने व मदतीने पुण्यातील एका सोनारास विकून त्यातून आलेल्या पैशातून महागडा मोबाइल व एक स्कूटी दुचाकी बुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. विधीसंघर्षग्रस्त बालके तसेच संशयित महिलेला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरफोडी करून चोरून नेलेले सहा तोळे वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत.
पाचगणी पोलिसांनी हा गुन्हा कौशल्यपूर्ण तपास करून उघडकीस आणला. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने, श्रीमती स्नेहल सोमदे वरूडे, अंमलदार रवींद्र कदम, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे यांनी ही कारवाई केली.