पुणे, दि. 6 – चांदणी चौक येथील पूल पाडल्यानंतर तेथे अतिरिक्त लेन तयार करण्यासाठी खडक फोडण्याचे काम सुरू आहे. येथील कठीण खडक फोडण्यासाठी सुरुंग लावणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे.
एका बाजूला वाहतुकीची कोंडी आणि दुसऱ्या बाजूला पाऊस यावर मात करत हे काम करावे लागत आहे. परिणामी, टेकडी फोडण्यासाठी आणखी दहा दिवस लागतील, असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. टेकडी फोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस लेन तयार होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या शुक्रवारी चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची हवाई पाहणी केली. तेथील पूल पाडल्यानंतर रस्ता रुंदीकरण आणि सर्व्हिस रोडचे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याची सूचना गडकरी यांनी”एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांना केली होती. येथील पूल दि. 2 ऑक्टोबरला रात्री 1 वाजता पाडण्यात आला. गडकरी यांच्या सूचनेनुसार नऊ ऑक्टोबरपर्यंत मार्गिका विस्तार आणि सर्व्हिस रोडचे काम होणे अपेक्षित होते. मात्र कठीण खडकामुळे या कामास उशीर होत आहे.
खडक फोडण्यासाठी तीन वेळा सुरुंग लावण्यात आला आहे. दिवसरात्र काम करूनही खडक फोडण्याचे काम निश्चित वेळेत पूर्ण होत नाही. खडक फोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त लेनचे काम सुरू केले जाणार आहे. त्यानंतर येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे. मात्र, खडक फुटल्यानंतरच या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक गरज भासेल त्यावेळी बंद करावी लागत असल्याचे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेगाने काम सुरू…
चांदणी चौकातील पूल पाडण्यात आल्यानंतर राडारोडा उचलण्यापासून येथील कामाने वेग घेतल्यानंतर अखंडपणे रात्रं-दिवस या ठिकाणी काम सुरू आहे. अतिरीक्त लेनचे काम अतिशय वेगाने तयार करण्याचे टार्गेट येथील अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतले आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक, सामान्य नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन वेगाने काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.