सोलापूर – उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे उजनी धरणामध्ये लुप्त झालेले पळसनाथ मंदिरासह सैराट चित्रपटामधील इनामदार वाडा तसेच ऐतिहासिक पाच पूल आदींचे दर्शन घडू लागले आहे. पळसनाथ मंदिर अद्यापही तसेच असून पळसदेव दर्शनासाठी भाविक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे मंदिर प्राचीन असून सुमारे ४६ वर्षे हे धरण उजनी धरणाच्या पाण्यात लुप्त झालेले आहे. मात्र ज्या-ज्या वेळी उजनी धरणाचे पाणी ओसरते त्या-त्यावेळी पळसनाथ मंदिराचे दर्शन सर्वांनाच घडते.
याचबरोबर इनामदार वाडा तसेच दगडी पाचपूल देखील सर्वांच्या नजरेस पडत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी घटल्यामुळे पळसनाथ मंदिर पाण्याबाहेर आले असून मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांसोबतच अभ्यासक देखील उत्सुकतेने मंदिराकडे जात आहेत. ग्रामदेवतांची प्राचीन हेमाडपंथी मंदिरे असलेल्या पळसदेव ग्रामस्थांनी पुनर्वसनानंतर नव्याने मंदिर बांधले आहे.
यामध्ये प्राचीन मंदिरातील मूर्ती शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे . मात्र प्राचीन मंदिराचा ठेवा तसाच ठेवण्यात आला आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीनंतर १९७८ साली उजनी धरणात प्रथम पाणीसाठा झाल्यानंतर २४ वर्षांनी सन २००२मध्ये पळसनाथाचे मंदिर बाहेर आले होते.
त्यानंतर २०१३ व २०१७ सालात मंदिर पाण्याबाहेर आले आणि मागील वर्षी म्हणजे २०२३ला मंदिर पाण्याबाहेर आले होते. मागील वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मार्च महिन्यातच पळसनाथाचे हे मंदिर पाण्याबाहेर आले असून यानंतर जून महिन्यापर्यंत पाऊस येईपर्यंत तरी हे मंदिर पाण्याबाहेरच राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.