माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 21 जागांसाठी तब्बल 340 अर्ज

नगर – माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज दि.10 अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत तब्बल 340 अर्ज दाखल झाल्याने तीन पॅनेल होणे तर अटळ आहेच पण प्रमुख दोन्ही पॅनलला उमेदवाऱ्या देताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

यानिमित्ताने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातील अंतर्गत राजकारण यानिमित्ताने चांगलेच तापले आहे. अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने दोन्ही मंडळाच्या नेत्यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक,शिक्षकत्तेर कर्मचारी व प्राध्यापकांची कामधेनू मानली जाणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून 9 फेब्रुवारीला मतदान होत आहे. जिल्हभर सोसायटीचे कार्यक्षेत्र असून या निवडणुकीसाठी सध्या दोन आघाड्या परस्पर विरोधात मैदानात उतरल्या असून तालुकानिहाय बैठका,मेळावे यातून शिक्षक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधाऱ्यांसमोर तिसरी आघाडी ही ऐनवेळी मैदानात उतरणार आहे,अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे.

प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पुरोगामी मंडळ,तर प्रा.अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधात परिवर्तन सेवा मंडळ गतवेळेप्रमाणे मैदानात उतरणार आहे. प्रा.कचरे यांच्या नेतृत्वाखाली गत सतरा वर्षापासून पुरोगामी सहकार मंडळाकडे एकहाती सत्ता आहे.

इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी तब्बल 45 जणांनी अर्ज सादर केले होते. तर कालपर्यंत 242 अर्ज आले होते. आज शेवटच्या दिवशी शंभर अर्ज आल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 340 अर्ज दाखल झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.