ठाणे – ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच मजूरांचा जागीच मृत्यू झाले आहेत. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते.
हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टची केबल तुटली आणि लिफ्ट कोसळल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत बचावकार्य राबविले.