गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेन्ड मस्त प्रस्थापित झाला आहे. खेळाडू, कलाकार आणि काही राजकीय नेत्यांच्या बायोपिकने थिएटरवर भरपूर गर्दी खेचली होती. बाळासाहेब ठाकरे, मोदी यांच्या बायोपिकबरोबरच आता समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या जीवनावरही बायोपिक येतो आहे.
या सिनेमाचा टीजर अलिकडेच रिलीज झाला. यामध्ये मुलायम सिंह यादव यांच्या प्रारंभीच्या जीवनातील प्रमुख प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मुलायम सिंह यादव हे हौशी कुस्तीपटू होते. त्यांना व्यायामाची आवड होती. ही एका शेतकऱ्याच्या मुलाची प्रेरणादायी कथा आहे. हाच मुलगा पुढे एका राज्याचा मोठा नेता बनतो, असे या टीजरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या सिनेमामध्ये अमित सेठी, मिमोह चक्रवर्ती, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, सुप्रिया कर्णिक, सयाजी शिंदे, सना आमीर शेख, झरीना वहाब यासारखी अनेक कलाकार मंडळी असणार आहेत. मुलायम सिंह यादव यांच्या राजकीय कारकिर्दीतील कोणकोणत्या मुख्य घटनांवर या सिनेमात प्रकाश टाकला जाणार आहे, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.