बारामती -करोनाची वाढती दहशत पाहता जळोची येथील युवकांनी एकत्र येत गावाच्या व शहराच्या सुरक्षेसाठी गावातील प्रमुख रस्ते बंद करत नागरिकांना घरातून बाहेर न येण्याचे घरोघरी जाऊन आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील महिला ज्येष्ठ व तरुणांनी घरातून बाहेर न पडण्याची ग्रामदेवताची शपथ घेतली आहे. पोलीस प्रशासन व आरोग्य कर्मचारी यांच्यावरील वाढता ताण कमी करण्याच्या हेतूने युवकांनी एकत्र येत पोलीस बांधवांना सहकार्य व मदत करण्याचे ठरविले आहे.
मोकाट फिरणाऱ्या लोकांची यादी बनवून पोलिसांना व प्रशासनाला देण्याची युक्ती तरुणांनी गावासमोर मांडली व गावाने देखील एक मताने ठराव करून या युक्तीला मान्यता दिली. गावातील तरुण घरोघरी जाऊन लोकांचे मनोबल वाढवत करोनासाठी लागणारा मदत निधी देखील जमा करून प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे युवकांनी ठरविले आहे. प्रशासनाने सांगितलेल्या उपाय योजना, सूचना गावातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.