नाशिक- लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरेच्या कॉलेजरोड येथील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला 54 तोळे सोने आणि शहरालगत असलेल्या मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधीच्या प्लॉटची कागदपत्रे आढळून आली असून त्याच्याकडे दोन लक्झरी कारही आहेत. सटाणा येथील वडिलोपार्जित घरीही पथकाने झडती घेतली. तेथे त्याचा भाऊ राहात असून तेथेही अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या आहेत.
दरम्यान, खरेला मंगळवारी (दि.16) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खरे यास 30 लाखांची लाच घेताना कॉलेजरोड येथील निवासस्थानी सोमवारी रात्री अटक केली होती.
पथकाकडून खरेच्या निवासस्थानाची सोमवारी रात्रभर झडती सुरू असताना तब्बल 16 लाखांची रोकड, 54 तोळे सोन्याचे दागिने मिळून आले. शहरालगत चांदशी, आनंदवली, आरटीओ, पळसे, गंगापूर येथे कोट्यवधींचे प्लॉट असलेली कागदपत्रे पथकाने जप्त केली. मंगळवारी दिवसभर पथकाकडून झडती सुरू होती. खरेकडील दोन लक्झरी कारची किंमत एक कोटीच्या आसपास आहे.
महिन्याचे वेतन सव्वालाख –
1993 मध्ये तालुका उपनिबंधक म्हणून खरे शासकीय सेवेत दाखल झाला. सध्या त्याचे वेतन एक लाख 25 हजार असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील सुरगाणा, येवला, नाशिक, सिन्नर, इगतपुरी येथे तालुका उपनिबंधक, जिल्हा बॅंकेत व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्याने सेवा बजावली आहे.