मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी या महानगरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी साइनबोर्ड ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या नियमाचे पालन कोणी केलेले नाही हे तपासण्यासाठी एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणीची अंतिम मुदत संपली आहे त्यामुळे ज्यांनी अशा पाट्या लावलेल्या नाहीत त्यांना नोटीस जारी करून कारवाई केली जाणार आहे.
या संबंधात जारी केलेल्या निवेदनात महापालिकेने म्हटले आहे की, दुकाने आणि आस्थापनांचे साइनबोर्ड मराठीत – देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले असावेत आणि ते ठळकपणे प्रदर्शित केले जावेत, असा आदेश महापालिकेने या आधीच काढला होता व त्यासाठी सर्वांना विशिष्ट मुदतही देण्यात आली होती.
या नियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पुढील 8 ते 10 दिवसात एक सर्वेक्षण केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांवर आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. मुंबईत मराठी भाषेचा प्रभाव कायम राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निर्णयाला विशेष महत्व आहे.