वॉशिंग्टन – रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनाला मदत म्हणून त्यांना मध्यम पल्ल्याची आधुनिक क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाकडून लवकरच घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. सध्या रशियाने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमण केले असून त्यांना थांबवण्यासाठी अमेरिकेकडून हा निर्णय घेतला जाईल, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
युक्रेनला रशियन तोफखान्याच्या बॅरेजेसशी लढा देण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे. तथापि, रशियात आतपर्यंत हल्ला करू शकतील अशा क्षमतेची रॉकेट्स मात्र युक्रेनला दिली जाणार नाहीत. कारण त्यामुळे दोन्ही देशांतील सध्याचा संघर्ष आणखी वाढू शकतो; त्यामुळे सध्या केवळ मध्यम पल्ल्याचीच क्षेपणास्त्रे त्यांना देण्याचा विचार आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेकडून उद्याच या विषयीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. रशियाला रोखण्याची ताकद युक्रेनच्या लष्करात निर्माण व्हावी हा एकमेव उद्देश या मागे आहे, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेने या आधी युक्रेनच्या मदतीसाठी दहा पॅकेजेस मंजूर केली आहेत. हे अकरावे पॅकेज असणार आहे.