इस्तंबुल – ग्रीसच्या काही भागांबरोबर तुर्कीये आणि बल्गेरियाला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे तेथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बल्गेरियाच्या सीमेजवळ आलेल्या पुरामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत.
तर शेजारच्या तुर्कीयेची राजधानी इस्तंबुलमध्ये देखील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे इस्तंबुलमधील मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. या पावसामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रीसमधील एकाचा अंगावर भिंत पडून झाला आहे. तर तिघांचा मृत्यू इस्तंबुलमध्ये झाला आहे. पुरामध्ये वाहून गेलेल्या आणखी तिघांचा शोध सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रीस, बल्गेरियाच्या काही भागातील वाहनेही पुरामध्ये वाहून गेली आहे. तर शेकडो दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तुर्कीयेतील काही दुकानांच्या पार्किंगमध्ये नागरिकांनी आश्रय घेतला असून या ठिकाणीही पुराचे पाणी शिरल्यामुळे लोकांना दुकानांच्या छतांवर आश्रय घेणे भाग पडले.
या वादळी पावसामुळे भूस्खलन होण्याचा धोका असल्यामुळे तुर्कीयेच्या स्थानिक प्रशासनाने स्कियाथोस या पर्वतीय भागातील वाहतूक बंद केली आहे. बल्गेरियाच्या दक्षिणेकडील काळ्या समुद्राच्या किनारपट्टीच्या भागात मोठा पूर आला आहे. या पुरामध्ये शहरांमधील वाहने वाहून जात असल्याचे दृश्य वृत्तवाहिन्यांनी दाखवले आहे.