नागपूर – पार्ट टाईम जॉबची ऑफर देऊन आणि दिलेला टास्क पूर्ण केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याची 11 लाख 96 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. उस्मानिया उर्दू शाळेजवळ, इतवारी येथे राहणारे फिर्यादी बतुल सैफुद्दीन अली (वय 25) हे घरी असतांना त्यांना 9905793671 या मोबाइलधारकाने कॉल करून पार्ट टाइम जॉबची ऑफर दिली.
तसेच दिलेला टास्क पूर्ण केल्यास आर्थिक आमिष दाखविले. बतुल सैफुद्दीन अली यांनी टास्क पूर्ण केले असता आरोपीने सुरूवातीला फायदा देत रक्कम परत दिली. एकदा दोनदा परतावा देऊन आरोपीने बतुल सैफुद्दीन अली यांचा विश्वास संपादन केला.
आरोपीने बतुल सैफुद्दीन अली यांना गुंतवणूक केल्यास चांगले रिफंड देण्याचे आमिष दाखविले. आरोपीने लिंक पाठवून व अली यांच्या बॅंकेचे विवरण घेऊन, वेळोवेळी, वेगवेगळया खात्यात एकूण 11,96,002 रूपये काढले. मात्र बतुल सैफुद्दीन अली यांना कोणताही फायदा न देता, कोणतीही रक्कम परत दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अली यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.