कोपरगाव – तालुक्यातील भोजडे चौकी परिसरातील किरण ठाकरे यांच्या घरावर अवकाशातून दगडासारखी टणक वस्तू पहाटेच्या सुमारास घराचा पत्रा छेदून घरात पडल्याने ठाकरे कुटुंबीयांसह परिसरात एकच धावपळ उडाली. पडलेली वस्तू ओबडधोबड आकाराची असल्याची माहिती घरमालक किरण ठाकरे यांनी दिली. पहाटेच्या दरम्यान अचानक घरावर दगडफेक झाल्याचा भास ठाकरे कुटुंबाला झाला होता, मात्र शेजारी राहणाऱ्या महेंद्र सिनगर यांनी आकाशातून चमकत जमिनीच्या दिशेने झेपावणारी वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याने हे आकाशातून पडले असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती ठाकरे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठवून घटनेचा पंचनामा केला. आकाशातून पडलेल्या या वस्तूला तहसीलदार विजय बोरुडे यांच्यामार्फत पुढील तपासणीसाठी खगोलशास्त्रज्ञाकडे पाठवले आहे. या घटनेची समाजमाध्यमांवर मोठी चर्चा झडली होती.
काही नागरिक उल्का सदृश्य वस्तू पडल्याचे तर काही आगीचा गोळा पडल्याची तर काही टणक वस्तू असल्याची चर्चा करत होते.
दरम्यान, ही टणक वस्तू घराचा पत्रा छेदून घरात पडली. त्यामुळे घरात एक ते तीन इंचाचा खड्डा पडला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.सुदैवाने या घटनेत कुणालाही काहीही इजा झालेली नाही. सायंकाळपर्यंत ही वस्तू नेमकी काय होती, याबाबत खुलासा करण्यात आला नाही. एकंदरीत या घटनेमुळे चर्चेला उधाण आले होते.