बीजिंग -चीनला शुक्रवारी रात्री भूकंपाचे एकापाठोपाठ एक हादरे बसले. त्यामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत तिघे मृत्युमुखी पडले, तर 27 जण जखमी झाले.
चीनचा युन्नान प्रांताला रात्रीच्या सुमारास भूकंपाचे चार धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 5 हून अधिक नोंदली गेली. त्यानंतर पहाटेपर्यंत त्या प्रांतात तब्बल 166 आफ्टरशॉक्स जाणवले. त्या हादऱ्यांनी सुमारे 20 हजार घरांमधील 72 हजाराहून अधिक नागरिक प्रभावित झाले.
भूकंपग्रस्त भागांमध्ये तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, चीनच्या चिंगहई प्रांताला शनिवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तब्बल 7.4 इतकी नोंदली गेली.
सुदैवाने, त्या हादऱ्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही ठिकाणी रस्त्यांचे आणि पुलांचे नुकसान झाले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. रस्ते आणि पुलांच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शनिवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणच्या 200 किलोमीटर परिसरात मागील 5 वर्षांत सुमारे 25 भूकंपांची नोंद झाली.