- एमआयडीसी पोलिसांकडून 35 हजारांचा दंड वसूल
पिंपरी – संचारबंदी असूनही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 70 नागरिकांवर शनिवारी (दि. 22) एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 35 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या सध्या कमी होत आहे. मात्र शासनाकडून लागू केलेले कठोर निर्बंध अद्यापही लागू आहेत. मात्र काही बेशिस्त नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पीसीएनटीडीए सर्कल, मोशी प्राधिकरण आणि मोशी येथे मॉर्निंग वॉकचे निमित्त करून घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शनिवारी सकाळी दंडात्मक कारवाई केली. अशा नागरिकांना पोलीस ठाण्यात आणून करोना रोखण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कठोर निर्बंधांचे महत्व पटवून देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल डेरे, कर्मचारी दिनेश मुंडे, पुना हगवणे, जयदीप खांबट, सागर कोळी, सुनील कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.