गोंदवले – एका मद्यधुंद चालकाने पंढरपूरहून दहिवडीकडे जाताना अपघातांची मालिकाच केली. मात्र, गोंदवल्यातील धाडसी ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून ही मालिका थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. चालक हणमंत गेजगे याने बेभानपणे गाडी चालवून सहा जणांना ठोकरल्याची अधिकृत माहिती असली तरी या भरधाव प्रवासात त्याने आणखी किती जणांना ठोकरले, याची माहिती मिळू शकली नाही.
गोंदवले बुद्रुक, ता. माण येथील मुख्य रस्त्यावर काल (दि. 19) रात्री आठच्या सुमारास सामसूम होत असतानाच एक चारचाकी वाहन रस्त्याने इतर वाहनांना ठोकरत येत असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व भास्कर कट्टे यांना म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी फोनवरून दिली. गोंदवल्यात ही बातमी पसरताच अपघात करत भरधाव निघालेले वाहन अडविण्यासाठी धावपळ झाली. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला. अपघातांना कारणीभूत असणारे वाहन थांबविण्यासाठी धैर्यशील पाटील यांनी स्वतःचा डंपर सातारा-पंढरपूर मुख्य रस्त्यावर आडवा लावला.
काही वेळातच एमएच-11-सीजी-3660 या क्रमांकाची ही पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी वेगाने येताना दिसली. म्हसवड पोलिसांची जीप त्या गाडीचा पाठलाग करत येत होती. त्यामुळे लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. ही गाडी थांबविण्यासाठी लोकांची धावपळ झाली. बाजूला एक एसटी बसदेखील उभी होती. रस्त्यावरच डंपर आडवा लावल्याने मद्यपी चालकाला त्याची गाडी थांबविण्याशिवाय पर्याय नव्हता.
चालक गेजगे याने गाडी थांबविताच लोकांनी गाडीला गराडा घातला. मात्र, गाडीची दारे, काचा बंद व इंजिन सुरू असल्याने धोका वाढला होता. मात्र, धैर्यशील पाटील यांनी धाडसाने गाडीच्या बॉनेटवर उभे राहून चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले. तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काचा फोडून गाडी बंद करण्यात आली. चालक हणमंत गेजगे याला बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला. तोपर्यंत या गाडीचा थरारक पाठलाग करणारे पोलीस घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी गेजगे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या गाडीचा म्हसवडमधून बंटी माने व त्यांच्या सहकाऱ्यांनीही पाठलाग केला होता.
दरम्यान, गेजगे याच्या वाहनाने वीरकरवाडी (ता. माण) येथील दोघांना पिलीव घाटात उडवून देऊन गंभीर जखमी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी या संपूर्ण प्रवासात आणखी किती जणांना धडक दिली, याची माहिती बुधवारी रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. म्हसवड पोलिसांनी गेजगेला ताब्यात घेऊन अपघातग्रस्त वाहन जप्त केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे तपास करत आहेत. म्हसवड पोलीस ठाण्याचे किरण चव्हाण, सूरज काकडे, संजय अस्वले, अनिल वाघमोडे यांनी या या वाहनाचा थरारक पाठलाग केला. गोंदवल्यात हे वाहन थांबवताच लोकांनी गर्दी केली होती.
गोंदवल्यातील मुख्य रस्त्यावर हे वाहन थांबविण्यात आले. त्यावेळी पाठीमागून गंभीर रुग्ण घेऊन रुग्णवाहिका आली होती. मात्र, ग्रामस्थानी रस्त्यावर आडवी लावलेली वाहने तातडीने बाजूला करून रुग्णवाहिकेला रस्ता रिकामा करून दिला. दरम्यान, दहिवडीतही सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिद्धनाथ मंदिरापासूनचा रस्ता मोकळा केला होता. काही ठिकाणी त्यांनी अडथळ लावून रस्ता काही वेळ बंद केला होता. मात्र, ती भरधाव गाडी गोंदवले बुद्रुकमध्येच पकडण्यात आल्याने दहिवडी पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.