शेवटच्या सभेत महापौरांकडून सभाशास्त्राचे नियम पायदळी

गणसंख्या नसतानाही सभा उरकली; विरोधकांचा आरोप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभाशास्त्राचे सर्व नियम पायदळी तुडवत आक्‍टोबर महिन्याची तहकूब आणि नोव्हेंबर महिन्याची मासिक सभा उरकण्यात आली. सभेला केवळ तीस नगरसेवक असतानाही सभा रेटून नेण्यात आली. तर विरोध करणाऱ्या नगरसेवकांना बोलू न देण्याचे धोरण महापौरांनी राबविले. विशेष म्हणजे बोलू पाहणाऱ्या नगरसेवकांचे माईक बंद करून विरोधी नगरसेवकांचा आवाज दाबवण्याचाही प्रयत्न या सभेत करण्यात आल्याने महापौर राहुल जाधव आपल्या कार्यकाळातील शेवटच्या सभेतही टीकेचे धनी ठरले.

बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. सभा सुरू होताच नगरसेवकांनी पाणी टंचाई आणि एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर प्रशासनाला धारेवर धरले. तब्बल चार तास पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांची भाषणे झाली. भाषण होताच अनेक नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. यामुळे सभेसमोरील विषय वाचण्यास सुरुवात होण्यापूर्वीच सभागृहातील सदस्यांची संख्या कमी झाली. ऑक्‍टोबर महिन्यातील सभा तहकूब असून तहकूब सभेला कोरमचा नियम लागू नसल्याचे सांगत महापौरांनी ऑक्‍टोबरची सभा रेटून नेली. या सभेसमोरील दहा विषयांपैकी पाच विषयांना उपसूचना देण्यात आल्या. यातील एकही उपसूचना पूर्णपणे न वाचताच त्याला मंजूरी देण्यात आली.

हा सर्व प्रकार सुरू असतानाच विरोधी पक्षाचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले व सभा तहकूब करण्याची मागणी करू लागले. मात्र त्यांना दाद न देता नोव्हेंबर महिन्यातील सभेसमोरील विषय वाचण्यास सुरुवात करण्यात आली. या सभेला गणसंख्येचा नियम लागू होत असल्याने सभा तहकूब करावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली मात्र त्याला न जुमानता महापौरांनी सभेसमोरील सर्व विषयांना अवघ्या काही मिनिटांत मंजुरी दिली.

तहकूब आणि चालू महिन्यातील दोन्ही सभेसमोरील विषय अवघ्या दहा मिनिटांत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले. या कामकाजादरम्यान सभाशास्त्राचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात येत असल्याची टीका माजी महापौर मंगला कदम या करीत होत्या. मात्र त्यांचा माईक बंद करून त्यांना बोलू देण्यात आले नाही. सभा चालविण्याची पद्धत, विषय मंजुरीचा प्रकार आणि विरोधी नगरसेवकांना बोलू देण्यात न आल्यामुळे विरोधकांनी या प्रकाराचा निषेध नोंदविला.

आजी – माजी महापौरांमध्ये वाद
दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी माजी महापौर मंगला कदम यांनी केली. यासाठी सभागृहात गणसंख्या अपूर्ण असल्याचे त्यांनी महापौर राहुल जाधव यांच्या लक्षात आणून दिले. मात्र तहकूब सभेच्या सुरुवातीला चर्चा होत असल्याचे सांगून दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी कदम यांनी महापौर जाधव यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सभागृहात कदम यांनी विषयपत्रिका देखील फाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.