झेडपीच्या अध्यक्षपदाची पताका मावळच्या खांद्यावर?

राष्ट्रवादी अचूक टायमिंग साधणार : स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न

वडगाव मावळ/टाकवे बुद्रुक – भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेला “मावळगड’ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने काबीज केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला आमदार म्हणून सुनील शेळके यांनी विजयी पताका फडकविली. आता जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे मावळ तालुक्‍याला अध्यक्षपद मिळेल, असे अडाखे बांधले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या टाकवे-वडेश्‍वर गटाच्या सदस्या शोभा कदम यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा मावळ वासियांना आहे. आता आमदार सुनील शेळके, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोर लावल्यास अध्यक्षपदाची अपेक्षापूर्ती व्हायला वेळ लागणार नाही.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अडीच वर्षांसाठी खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून या प्रवर्गातून सात तालुक्‍यामधील 15 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी या महिलांमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा परिषद स्थापनेपासून आजपर्यंत मावळ तालुक्‍याला अध्यक्षपद मिळालेले नाही. आता खुल्या महिला प्रवर्गामुळे मावळला संधी आली आहे. टाकवे-वडेश्‍वर गटाच्या सदस्या शोभा कदम यांच्या रुपाने मावळला अध्यक्षपद मिळू शकते, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. आगामी राजकीय समीकरणांचा विचार करता सध्या तरी अध्यक्षपदासाठी मावळचे पारडे जड मानले जात आहे.

गेल्या 25 वर्षांनंतर मावळ तालुक्‍यात सत्तांतर घडविण्यात यश आले आहे. सुनील शेळके यांच्या रुपाने पक्षाला पहिला आमदार मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीतील विजयानंतर अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्ष किंवा सभापतिपदाची संधी मिळण्याची चिन्हे दिसून लागली आहे. तालुक्‍यात पाच गटांपैकी शोभा कदम आणि कुसूम काशीकर तसेच अपक्ष विजयी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य बाबुराव वायकर असे तीन सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे वायकर यांनीही उपाध्यक्ष अथवा सभापतीपद मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

पंचवीस वर्षांनंतर झालेला बदल आणि विधानसभा निवडणुकीतील भरघोस यश या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्‍याला यावेळी प्रमुख पदाची संधी मिळणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून सांगितले जात आहे. जिल्हा परिषदेवर पूर्वीपासूनच एकत्रित कॉंग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस वर्चस्व राहिले आहे. 1997 मध्ये दिलीप टाटिया यांना बांधकाम समितीचे सभापतीपद मिळाले होते. तर गेल्या पंचवार्षिकमध्ये अतिष परदेशी समाजकल्याण समितीचे सभापती होते. जिल्हा परिषदेच्या 52 वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्‍याला जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही, आता संधी मिळण्याची आशा वाढली आहे.

पुणे जिल्हा परिषदेला आजपर्यंत 52 वर्षांचा इतिहास आहे. मात्र मावळ तालुक्‍यात अध्यक्षपदीची एकदाही संधी मिळाली नाही. आता खुल्या महिला आरक्षित झाल्यामुळे संधी निर्माण झाली आहे. अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास संधीच सोने करुन तालुक्‍यासह जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
– शोभा कदम, सदस्या, टाकवे-वडेश्‍वर गट.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here