उत्तर प्रदेश : कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात आपण नारळ फोडून करतो. त्याला शुभ शकुन आपण मानतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका उदघाटनाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या उदघाटनप्रसंगा दरम्यान फोडण्यात आलेल्या नारळामुळे उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड झाला आहे.
बिजनौरमध्ये भाजपा आमदार सूची चौधरी रस्त्याचे उद्घाटन करत असताना नारळ वाढवण्याच्या वेळी नारळ फुटलाच नाही, त्याऐवजी रस्त्यात मात्र खड्डा पडला. या घटनेमुळे उद्घाटनप्रसंगीच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. यावर काँग्रेसने ट्विट करत टीका केली आहे.
सिंचन विभागाकडून बिजनौरमधील कालव्याजवळ रस्ता तयार करण्यात आला. 7 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी 1 कोटी 16 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र केवळ 700 मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावरच या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. एकूण 7 किलोमीटरचा रस्ता तयार करुन त्याला कडापूर, झालपूर, उलेढा आणि हिमपूरला जोडण्याची योजना आहे.
रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदार सूची चौधरी या आपल्या पतीसह पोहोचल्या. विधीवत पूजा पार पडल्यानंतर आमदारांनी नारळ वाढवण्यास सुरुवात केली. सूची चौधरी यांनी नारळ फोडण्यासाठी रस्त्यावर आपटला. मात्र, नारळ फुटलाच नाही. त्या ऐवजी रस्त्यावर खड्डा पडला. त्यामुळे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. यावेळी नाराज आमदार आणि नागरिकांनी घटनेवर संताप व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणी चौकशीची मागणी केली.
जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत समिती स्थापन केली आहे. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामात कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, असे आश्वासनही जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी दिले आहे.