कैरो – सुदानमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष करत असलेल्या निमलष्कर आणि लष्करामध्ये नव्याने युद्धबंदी करण्यात आली आहे. राजधानी खार्तुम आणि शेजारील ओमडुरमन शहराच्या आजूबाजूच्या परिसरामधील परिस्थिती आज शांत होती. याच भागामध्ये संघर्षाच्या प्रारंभीच्या काळात जोरदार संघर्ष होत होता.
सुदानमदील नागरिकांच्या मदतीसाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र आणि अन्य देशांनी मिळून तीन दिवसांची परिषद आयोजित केली आहे. या काळात युद्धबंदी पाळण्यास दोन्ही गटांनी सहमती दर्शवली आहे.
सुदानमधील मानवतावादी मदतीसाठी 2.57 अब्ज डॉलरची आवश्यकता असताना 16 टक्क्यांपेक्षा कमी निधी संकलित झाल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सुदानच्या शरणार्थ्यांसाठी आणखीन 470 दशलक्ष डॉलरची आवश्यकता असल्याचेही संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सुदानमधील लष्कर आणि निमलष्करामध्ये युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबियासह काही आंतरराष्ट्रीय मुत्सद्यांनी मध्यस्थी केली आहे.
सुदानमधील संघर्षात आतापर्यंत 3 हजार लोक ठार झाले आहेत. तर 8 हजार जण जखमी झाले आहेत. संपूर्ण देशभरातून 20 लाखांपेक्षा अधिक लोकांनी शेजारील देशांमध्ये किंवा सुदानमधील सुरक्षित ठिकाणी पलायन केले आहे.