प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 13 -महापालिकेकडून वारजे येथे 700 बेड्सचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल “पीपीपी’ तत्वावर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी हॉस्पिटलचे काम करून देणाऱ्या आणि चालविणाऱ्या संस्थेस आवश्यक कर्जासाठी पालिका जामीनदार असेल. राज्यात पहिल्यांदाच असे हॉस्पिटल उभारले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी राज्यशासनाने मान्यता दिली असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे उपस्थित होते. दरम्यान, स्थायी समितीची तत्कालिन अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुढाकार घेत या हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव आणला होता. त्यानंतर सर्वसाधारण सभेने मंजूर करून तो राज्यशासनास पाठवला होता.
नेदरलॅंड्स देणार कर्ज
हॉस्पिटल उभारणीसाठी नेदरलॅंड्सच्या राबो बॅंकेकडून एक ते दीड टक्के दराने कर्ज घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिका जामीनदार असेल. संस्थेने काम अर्ध्यातच सोडले, तर अडचण टाळण्यासाठी विमा उतरवला जाणार आहे. महापालिकेने पाठविलेल्या रुग्णांवर निर्धारित दराने उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध असतील. तर, काही बेड्स खुल्या दराने संबंधित संस्थेला दिले जाणार आहेत. रुग्णालय उभारणी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नेमणूक व उपचारांची जबाबदारी ही संबंधित संस्थेची असेल. या हॉस्पिटलचा पश्चिम भागातील पुणेकरांना मोठा लाभ होईल.