पुणे -मूक चित्रपटापासून सुरू झालेला सिनेमाचा प्रवास तळहाताएवढ्या डिस्प्लेपर्यंत पोहचला. तंत्रज्ञान पुढे जात असताना आपण सध्या व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानापर्यंत पोहोचलो असून, याच तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर करत आहे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा ऐतिहासिक चारित्रपट समोर येणार असल्याची माहिती सृजन कॉलेज ऑफ डिझाइनचे संचालक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते, लेखक-दिग्दर्शक योगेश सोमण, तेजोनिधी भंडारे, अमित नाडकर्णी, बाळू काटे, रवी बारापत्रे उपस्थित होते. सृजन निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहेत. प्रसिद्ध ऍनिमेटर चंद्रकांत पाटील चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असणार आहेत.
तर, रवी बारापत्रे, बाळू काटे, संतोष जाधव, उमेश कोकाटे आणि अंशूल रासकर या चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. रिलायन्स अनिमेशन स्टुडिओचे कलाकारदेखील यामध्ये सहकार्य करणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
या चित्रपटाबाबत अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, “सुमारे 45 मिनिटांच्या चित्रपटात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा यांसह साक्षरतेचा प्रसार, हिंदू शुद्धीकरणाची मोहीम, पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अभिनव भारतच्या क्रांतिकारकांनी सावरकरांची मुक्तता करण्यासाठी एमडेन नावाची युद्धनौका धाडली असे विविध प्रसंग चित्रपटात पाहायला मिळतील.’