वाई – गौरवशाली ऐतिहासिक वारसा आणि शौर्याची परंपरा जपतानाच, वाईच्या स्वातंत्र्यसेनानींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदानही अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी काढले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमांतर्गत वाई पालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक यांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमासाठी स्वातंत्र सेनानींचे नातलग व स्वतः माजी सैनिकांनी उपस्थिती दर्शविली. त्यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन यथोचित गौरव करण्यात आला. मुख्याधिकारी संजीवनी दळवी, कार्यालय अधिक्षक नारायण गोसावी तसेच राजाराम जाधव यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र सेनानींचे नातलग सुरेंद्र साठे, राजेंद्र बागुल, विनोद सोहनी, रमाकांत वीर, अनंत वैद्य यांनी उत्स्फुर्त मनोगतातून स्वातंत्र संग्रामाचा इतिहास सर्वांसमोर मांडला. भारावलेल्या हृदयातून उचंबळून आलेल्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर नारायण गोसावी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश केसकर यांनी केले. सर्व उपस्थित नागरिक, स्वातंत्र्य सेनानी, आजी माजी सैनिकांनी शासकीय उपक्रमाचे कौतूक करून वाई नगरपरिषदेस धन्यवाद दिले.