कोयनानगर(प्रतिनिधी) – हेळवाक (ता. पाटण) येथे गुरूवारी रात्री कुत्र्यांचा पाठलाग करत असताना बिबट्या थेट घरात घुसल्याची घटना घडली. ही बाब कारंडे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घराचा दरवाजा बंद करून बिबट्याला घरातच कोंडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कोंडलेल्या बिबट्याला वन विभागाने नंतर जेरबंद केले.
कराड- चिपळूण राज्यमार्गावर हेळवाक येथे सुधीर कारंडे याचे घर आहे. गुरुवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या थेट त्यांच्या घरात शिरला. दरम्यान, कारंडे कुटुंब दुर्गादेवी विसर्जनासाठी बाहेर गेले होते. ते घरी परतल्यानंतर त्यांना घरात बिबट्या शिरल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी तात्काळ घराबाहेर पडून दरवाजा बंद करत बिबट्याला घरातच कोंडले. तसेच त्यांनी याबाबतची माहिती ग्रामस्थ व वन्यजीव विभागाला दिली. वन्यजीव विभाग, हेळवाक ग्रामस्थ व कोयनानगर पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करत चार तासाच्या थरारानंतर रात्री १ वाजण्याच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.
हा बिबट्या 1 वर्षांचा लहान बछडा आहे. बिबट्याच्या एका डोळ्यास मोतीबिंदू झाल्याचे, तसेच त्याच्या मागील उजव्या पायासही इजा झाल्याने तो लंगडत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानुसार वन विभागाने या बिबट्यास जेरबंद केल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी अन्यत्र हलविले आहे. वन्यजीव विभागाचे हेळवाकचे वनक्षेत्रपाल संदीप झोपळे, संदीप कुंभार यांनी परिश्रम घेतले.