पुणे – घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. मात्र, वर्चस्व अथवा आर्थिक फायद्यासाठी हे कृत्य केल्याचे वाटत नाही. गुन्ह्यात मोक्का लागू होतो की नाही संशयास्पद असल्याचा निष्कर्ष मोक्काचे विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी एका महिन्यात पाच जणांना जामीन मंजुर केला आहे.
शफिक हुसेन शेख, आकिब शकिफ हुसेन, आदील शफिक शेख (तिघेही, रा. कात्रज), राजू सखाराम, किरण सखाराम कांबळे आणि आलीम ऊर्फ सोनू रफिक शेख (दोघे, रा. कोंढवा) अशी जामीन झालेल्यांची नावे आहेत. सर्वांनी ऍड. अफरोज शेख यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 1 जानेवारी 2022 रोजी ही घटना घडली.
अटक केलेल्या सर्वांना मोक्का लागू होत नाही. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांच्याकडून कोणतीही जप्ती झालेली नाही. वर्चस्व अथवा आर्थिक फायद्यातून गुन्हा झाल्याचे दिसून येत नसल्याचे बचाव पक्षातर्फे ऍड. अफरोज शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत 59 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. आठ जणांनी घरात घुसून घरातील व्यक्तीला मारहाण करून दोन हजार रुपयांची जबरी चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये दहा दिवसात जामीन मिळाल्यानंतर मोक्का लावण्यात आला होता. आरोपींवर इतर गुन्हे दाखल आहेत. मात्र, ते सुटले आहेत. त्यामुळे मोक्का लागू होत नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.