दावडी, (वार्ताहर) – कनेरसर (ता. खेड) येथील जालींदरनगर परिसरात गेली दोन महिन्यात अनेकदा नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. रामदास धर्माजी झोडगे यांचा कुत्रा व लहान वासरू यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. मंगळवारी (दि. 16) रात्रीही रस्त्यावर बिबट्याला रामदास झोडगे व पांडुरंग लोखंडे यांनी पाहिले होते.
याबाबत तातडीने कार्यवाही केली जावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्य वनसंरक्षक पुणे, उपवनसरंक्षक जुन्नर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजगुरूनगर यांच्याकडे केली आहे.
थिटेवाडी बंधाराजवळ असल्याने पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे. तसेच ज्वारी व मका या पिकांमुळे बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीवर बिबट्या धडकला असून प्राणीच नाही तर लहान मुलांना त्याच्यापासून धोका आहे.वनसंपदा नष्ट होत चालल्याने भक्ष्य व भक्षक साखळी अस्तित्वात राहिली नाही,
त्यामुळे वन्य प्राणी गाव-वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी वर्गाला त्यामुळे जीव मुठीत धरून रात्री अपरात्री शेताला पाणी देण्याचे काम करावे लागत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री फिरणे कठीण झाले आहे.
वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा. कनेरसर परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वन अधिकार्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन बिबट्याच्या पाऊलखुणांचा अभ्यास करावार एकापेक्षा जास्त बिबटेही या परिसरात असू शकतात. पिंजरा लावला जावा व इतर सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी टाव्हरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. कनेरसर परिसर हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो.