पिंपरी -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत शनिवारी (दि. 2) आयोजित मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी शहरातून मनसेचे कार्यकर्ते जाणार आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून मनसेकडून शक्तीप्रदर्शन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
मुंबईतील शिवतीर्थ येथे आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे विचार मांडणार आहेत. त्यासाठी शहरातून मनसेचे कार्यकर्ते जाणार आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी मनसेच्या (पिंपरी चिंचवड शहर) सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नुकत्याच बैठका घेण्यात आल्या. पिंपरी विधानसभेची बैठक पिंपरीतील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात झाली. चिंचवड विधानसभेची बैठक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांच्या चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात झाली. तर, भोसरी विधानसभेची बैठक विशाल मानकरी यांच्या रुपीनगर-रामेश्वर चौक येथील निवासस्थानात घेण्यात आली.
शहर प्रभारी गणेश सातपुते, प्रभारी किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेचे कार्यकर्ते, ज्या नागरिकांना राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मुंबईला जायचे आहे, त्यांच्यासाठी पिंपरीतील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयापासून शनिवारी (दि. 2) दुपारी 12 वाजता बसची व्यवस्था केली आहे, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.