नवी दिल्ली : गुजरातमध्ये सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. जुनागढ येथील दर्गा हटवण्याच्या नोटीसवरून या ठिकाणी मोठा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. नोटीस मिळाल्यानंतर दर्गासमोर शेकडो लोकांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या घटनेत डेप्युटी एसपीसह चार पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या घटनेमध्ये एकाचा मृत्यूही झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
जुनागडमधील माजेवाडी गेटसमोर रस्त्याच्या मधोमध एक दर्गा बांधण्यात आली आहे. तो हटवण्यासाठी महापालिकेच्यावतीने वरिष्ठ नगररचनाकारांना नोटीस बजावण्यात आली होती. हे धार्मिक स्थळ बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे नोटीसमध्ये लिहिले होते. पाच दिवसांच्या आत या धार्मिक स्थळाच्या कायदेशीर वैधतेचे पुरावे सादर करावेत, अन्यथा हे धार्मिक स्थळ पाडण्यात येईल आणि त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. धार्मिक स्थळ (दर्गा) पाडण्याची नोटीस लावण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले होते. नोटीस वाचताच काही समाजकंटक जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा त्यांनी पोलीसांवर हल्ला केला.
#WATCH | Stones pelted, cops injured after a mob protest against the anti-encroachment drive in Gujarat’s Junagadh last night
(Note: Abusive language) pic.twitter.com/8wRw0YgO3z
— ANI (@ANI) June 17, 2023
संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत 200-300 लोक दर्ग्याभोवती जमले. पोलिसांनी त्यांना या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडफेक सुरू केली आणि पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक डेप्युटी एसपी आणि तीन पोलीस जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस संपूर्ण शहरात कसून चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात असून, संपूर्ण जुनागड शहरात शेकडो पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, काल रात्री उशिरा पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.