मुंबई – स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध माती’चा ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी शुभमच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र या मालिकेनंतर हर्षदच्या नव्या मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता हर्षद एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या नव्या मालिकेत हर्षद आता एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
कबीर हे पात्र हर्षदसाठी फारच वेगळे असणार आहे. याबाबत त्याने सांगितले की, “या मालिकेचे कथानक खूप छान आहे. कामावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कबीर साकारताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. कबीर हे पात्र मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. कबीर हा तळागाळात जाऊन काम करणारा पत्रकार आहे.”
तो पुढे म्हणाला की, “फुलाला सुगंध मातीचा मालिका संपल्यानंतर पुन्हा कधी भेटायला येणार ही सतत विचारणा होत होती. अखेर योग्य वेळी ही सुवर्णसंधी चालून आली आणि मी तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला. माझ्या याआधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. हेच प्रेम कुन्या राजाची गं तू मालिकेतील कबीरवर करतील याची मला खात्री आहे.”
https://www.instagram.com/reel/CtlDHEFphQB/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
हर्षदची ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही नवी मालिका 18 जुलै पासून सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. विशेष म्हणजे स्टार प्रवाहवरच ही मालिका पाहता येणार आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “स्माईल की ईस्माईल???”मन झुलतया गात गानी..”कुन्या राजाची गं तू रानी”नवी मालिका मंगळवार 18 जुलैपासून सोम-शनि सायं.7 PM Star प्रवाह वर.” याआधी हर्षद छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘दुर्वा’या मालिकेतूनही केशव या व्यक्तिरेखेद्वारे घराघरात पोहोचलेला होता.