लोणंद (प्रतिनिधी) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीखाली आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली.
लोणंद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गोटेमाळ येथील पाण्याच्या टाकीखाली गेले कित्येक महिने लोणंद नगरपंचायत कचरा साठवून ठेवत आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग साठून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आज अचानक या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागली.
आगीची माहिती मिळताच सीईओ हेमंत ढोकले यांनी नगरपंचायतीचे कर्मचारी व लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी पोलिस कर्मचारी घटनास्थळी पाठवून आग विझवण्याचेआटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली आहे. या आगीचे कारण समजले नाही. अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याची शक्यता घटनास्थळी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली।