सिंहगड रस्ता, दि. 1 (प्रतिनिधी) -सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे आणि मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यावरील दुभाजक काढण्यात आले आहेत. आता, पुन्हा या रस्त्यावरील रस्ता दुभाजकांच्या सुशोभिकरणाच्या कामावर किमान 25 ते 50 लाख खर्च करण्यात येणार असून या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने तोडफोड करून सुशोभिकरणावर अशी उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिंहगड रस्त्यावर फनटाइम चित्रपटगृहापासून राजाराम पुलापर्यंत उड्डाणपुलाचे काम काम सुरू असून वाहतुकीला अडथळा नको म्हणून संपूर्ण रस्त्यामधील दुभाजक काढण्यात आले आहेत. दुभाजकांच्या जागेवर खांब उभारण्यात आले आहेत. आता, सिंहगड रस्ता येथे दुभाजक सुशोभिकरणाचे कामे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. यातून रस्त्याची रुंदीही कमी करण्यात आली आहे, त्यामुळे सुशोभिकरण नेमके कोठे करणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. तर मनपाकडून रस्ता रूंदीकरण सुरू आहे. मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेडिंग लावून काम सुरू आहे, त्यामुळे दुभाजक काढण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामामुळे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे, या रस्त्यांची दुरुस्ती मनापाकडून होणे अपेक्षित असताना पालिकेच्या पथ विभागाकडून रस्त्याच्या सुशोभिकरणावर खर्च केला जाणार आहे. यासाठीच्या खर्चाची निविदाही काढण्यात आली असून त्यास मंजुरीही दिली गेल्याचे सांगितले जात आहे.
आर्थिक टंचाईत उधळपट्टी…
करोनानंतरच्या काळानंतर महसूल कमी आणि खर्च अधिक अशा आर्थिक पेचात महापालिकेचा कारभार सुरू असताना अनावश्यक कामांवर उधळपट्टी करू नये, असे आदेश प्रशासक तथा आयुक्तांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. परंतु, सिंहगड रस्ता तसेच पुणे विद्यापीठ चौकातील रस्त्याच्या सुशोभिकरणावर होणारा खर्च म्हणजे मनपाकडून उधळपट्टीच होत असल्याची चर्चा आहे.
शहर तसेच उपनगरांमध्ये लोकप्रतिनिधींचा वचक नसल्यामुळे अनेक विकासकामे निधी अभावी खोळंबली आहेत. त्यातच प्रशासक असल्यामुळे मूलभूत कामेही रेंगाळली आहेत. ज्या कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष होत असून अनावश्यक कामांवर नागरिकांचे पैसे खर्च होताना दिसत आहे, याबाबत एकत्रितरीत्या विरोध होणे गरजेचे आहे.
– दशरथ मणेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पुणे