पुणे, दि. 1 -काही महिन्यांपूर्वी औंध येथील इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे उभारलेल्या रूफ टॉप हॉटेलला आग लागल्यानंतर महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 88 हॉटेल आढळून आली आहेत. त्यानंतर या हॉटेलचालकांना केवळ नोटीसा बजाविण्यात आल्या असून, ही हॉटेल राजरोसपणे सुरूच असल्याची माहिती बुधवारी कोंढव्यात रूफ टॉप हॉटेलला लागलेल्या आगीतून पुन्हा एकदा समोर आली आहे.
शहरातील ही अनधिकृत हॉटेल माहीत असूनही कारवाईसाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने ही कारवाई होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बंदोबस्त मिळत नसल्याने पालिका केवळ नोटीसा बजाविण्याचे कागदी घोडे नाचवत आहे.
टेरेसवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करून अशा प्रकारे हॉटेल उभारणे बेकायदा असताना महापालिकेच्या काही अधिकारी तसेच पोलिसांना हाताशी धरून ही हॉटेल उभारली जातात. त्यामुळे त्या ठिकाणी आगीसारख्या घटनेच्या वेळी आवश्यक असलेली कोणतीही सुरक्षा साधने ठेवली जात नाहीत. तसेच फायर ऑडीटही करून घेतले जात नाही. काही महिन्यांपूर्वी औंध येथे एका टेरेसवरील हॉटेलला आग लागल्याची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरात केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 88 टेरेसवर अनधिकृतपणे हॉटेल उभारण्यात आल्याचे समोर आले. पालिकेने या हॉटेलला नोटीसा दिल्या, तर काही हॉटेलवर देखाव्यापुरती कारवाई केली. त्यानंतर सर्व हॉटेल पुन्हा सुरू आहेत. यातील अनेक हॉटेल व्यावसायिक तसेच निवासी इमारतींमध्ये असल्याने त्या ठिकाणी कारवाईस जाताना महापालिकेस पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असते. मात्र, पोलिसांकडून या कारवाईसाठी बंदोबस्तच महापालिकेस दिला जात नसल्याने कारवाई करण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले.
नोटिसीनंतरही हॉटेल सुरू
कोंढवा येथे लागलेल्या आगीतील हॉटेलला महापालिकेकडून नोटीस बजाविण्यात आल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांनी सांगितले. याशिवाय अनेक भागात कारवाईसाठी जाताना पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असते. त्यामुळे स्थानिक पोलिसांना पत्र देण्यात आली असून, बंदोबस्त मिळताच तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एका बाजूला महापालिका कारवाईसाठी पोलिसांची वाट पाहत असली तरी, पालिकेच्या नोटिसीनंतरही अशी हॉटेल धोकादायक स्वरूपात सुरू असून, त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.