तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – घरात राहत असलेल्या दोघी मायलेकी कामावर गेल्या होत्या. अचानक घराला आग लागली. अवघ्या काही मिनिटांमध्ये होत्याचे नव्हते झाले. आग आटोक्यात आली तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले. आता पुन्हा संसाराला सुरूवात कशी करायची, असा प्रश्न मावळ तालुक्यातील निगडे गावात राहणाऱ्या अलकाबाई ठाकर यांना पडला. त्यांची ही व्यथा चिंचवडमधील संस्कार प्रतिष्ठाणच्या कानावर गेली. अवघ्या आठवडाभरात जमा झालेली मदत त्यांनी अलकाबाई यांच्याकडे सुपूर्द केली.
निगडे येथे अलकाबाई आणि त्यांची मुलगी अशा दोघीचजणी राहतात. घरात पुरूष माणूस आणि कमावती व्यक्ती नसल्याने त्या दोघी मोलमजुरी करून उपजिविका चालवितात. ४ एप्रिल रोजी त्या दोघीजणी कामावर गेल्या असताना त्यांच्या घराला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यामुळे त्या दोघींनीही घराकडे धाव घेतली. पेटत्या घरातून साहित्य बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही. डोळ्यादेखील काडी-काडी जमा करून उभारलेल्या संसाराचाी राखरांगोळी झाली. पुन्हा संसार कसा उभा करायचा, भांडीकुंडी कोठून आणायची, धान्यही जळून गेल्याने काय खायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.
अलकाबाई यांची चिंचवडमधील संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी भांडी दिली तर काहींनी अन्नधान्य दिले. तर काहींनी रोख रक्कम दिली. जमा झालेल्या वस्तू, धान्य आणि रोख रक्कम घेऊन संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते थेट निगडे येथील आदीवासी वस्तीवर पोचले.
संस्कारन प्रतिष्ठानने अलकाबाई यांना हंडा, कळशी, बादली, ताट, तांब्या, वाटी, फुलपात्र, ग्लास, तवा आणि इतर साहित्य दिले. तसेच पाच हजारांची रोख रक्कमही दिली. याशिवाय दोन महिने पुरेला एवढे किराणा साहित्य दिले.
संस्थेच्या संचालिका प्रिया पुजारी, जेष्ठ सभासद प्रभाकर मेरुकर, विजय आगम, विकास पाटील, जयवंत सुर्यवंशी, तेजस मोरे, रोहित मोरे, संजित पद्मन, सुनिता गायकवाड, संध्या स्वामी उपस्थित होते. मदत करणाऱ्या सर्व सभासद व विविध जिल्ह्यातुन आलेल्या देणगीदार सभासदांचे अलकाबाई ठाकर यांनी आभार मानले.
श्रमदानातून उभारली झोपडी
झोपडी जळाल्याने डोक्यावरचे छप्पर गेले. सध्या ऊन खूप आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी ताडपत्री दोरी घेतली हे सर्व साहित्य निगडे गावचे सरपंच भागवत आणि माजी सरपंच सोपानराव ठाकर यांच्या उपस्थितीत त्या महिलेला दिले.
एवढ्यावरच संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते थांबले नाहीत. त्यांनी तात्पुरता निवारा करण्यासाठी एक झोपडी सभासदांनी श्रमदानातून तयार केली. यावेळी मा सरपंच सोपानराव ठाकर यांनी सर्वांचे आभार मानले.