भरतपूर – “मला 6 मुली झाल्यामुळे माझी सासू मला त्रास देते. त्यामुळे मी हे पाऊल उचलले. माझ्या मुलीचा सांभाळ करा. तुमचे उपकार होतील. मला माफ करा.’ हे शब्द भरतपूर येथील महिला रुग्णालयाच्या आवारात आपल्या नवजात मुलीला सोडून पसार झालेल्या एका असहाय्य आईचे आहेत.
अगोदरच 6 मुली असणाऱ्या या महिलेला 7 वीही मुलगीच झाली. यामुळे सासरच्यांच्या छळाला कंटाळून तिने आपल्या पोटच्या गोळ्याला रुग्णालयातच ठेवून पोबारा केला. तत्पूर्वी, या असहाय्य मातेने एक भावनिक पत्र लिहिले. या पत्रात तिने ही मुलगी सापडेल त्याला आपल्या मुलीचा सांभाळ करण्याचे आवाहन केले. एका वाटसरूने रुग्णालयाच्या आवारात रडणारे तिचे नवजात बाळ पाहिले. त्याने ती माहिती पोलिसांना दिली. तसेच मुलीला रुग्णालयातही दाखल केले.
भरतपूरच्या मथुरा गेट ठाणे हद्दीतील जनाना (महिला) रुग्णालयात ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास रामवीर नामक व्यक्तीला एक नवजात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी तिथे कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे रडण्याचा आवाज ऐकून तो थक्क झाला.
रामवीर नावाची व्यक्ती आवाज येणाऱ्या दिशेने गेली असता त्यांना कपड्यात गुंडाळलेले एक नवजात अर्भक जमिनीवर पडल्याचे दिसले. बाळ जोरात रडत होते. त्याला पाहताच रामवीरला धक्का बसला. मुलीजवळ काही कागदपत्रे पडली होती. रामवीर ही मुलगी व ती कागदपत्रे घेऊन रुग्णालयात गेला. तिथे ड्युटीवर तैनात डॉक्टरांना भेटून संपूर्ण हकीकत सांगितली.