HSC Exam: दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घरी सांभाळणारे कोणीच नसल्याने एक आई त्याला घेऊन थेट बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचली. केंद्राच्या आवारातील एका झाडाला झोळी केली. तान्हुल्याला झोळीत झोपवून ती पेपर देण्यास गेली. ते पाहून तिथे ड्यूटीवर तैनात एका महिला पोलिस शिपायाने तान्हुल्याचा सांभाळ केला. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर हजर असणारे सारेच जण भारावले…
चंद्रपूरातील घटना –
चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील जनता विद्यालयातील ही घटना घडली. भाग्यश्री रोहित सोनूने असे या मातेचे नाव आहे. तिचा बारावीचा इंग्रजीचा पेपर होता. नवरा कामावर गेलेला होता. दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा सांभाळ करणारे कुणीच घरी नव्हते. दुसरीकडे, पेपरही महत्त्वाचा होता. अशात भाग्यश्री सोनूने थेट दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचली.
महिला पोलिसाने बाळाला सांभाळले –
केंद्राबाहेर एका झाडाखाली झोळी तयार केली. त्यात तान्हुल्याला झोपवून ती परीक्षा देण्यासाठी गेली. भाग्यश्रीची माया आणि तिला शिक्षणाची असणारी गोडी पाहून परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलिसाने आपले कर्तव्य बजावत त्या तान्हुल्याचा ३ तास सांभाळ केला. या दोन्ही महिलांना पाहून उपस्थितही भारावून गेले.
पेपर संपला अन् मुलाला पाहून भाग्यश्रीच्या जिवात जीव आला –
बाळाला झोळीत झोपविल्यानंतर पेपर सोडविताना अधूनमधून ती त्याला बघायला बाहेर यायची. परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. तिने भाग्यश्रीला ‘तू पेपर सोडव मी बाळाकडे लक्ष देते,’ असे सांगितले. संपूर्ण पेपर होईपर्यत त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने बाळाकडे लक्ष दिले. एकदाचा पेपर संपला अन् मुलाला पाहून भाग्यश्रीच्या जिवात जीव आला. भाग्यश्रीची धावपळ आणि महिला पोलिसाची संवेदनशीलता पाहून उपस्थितही भारावून गेले.