नवी दिल्ली : – हिरे व्यापारी नीरव मोदी, आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदी या फरार आरोपींना केंद्र सरकारने परदेशातून परत आणावे. तसे झाल्यास परदेश दौऱ्यावरून परतणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही विमानतळावर जाऊन स्वागत करू, अशी भूमिका कॉंग्रेसने गुरूवारी मांडली.
ऑस्ट्रेलिया, जपान आणि पापुआ न्यू गिनी या तीन देशांच्या दौऱ्यावरून मोदी मायदेशी परतले. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना विचारला.
त्यांनी उत्तरादाखल नीरव आणि ललित या इतर दोन मोदींचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी मायदेशी परतताच ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने पाच भारतीय राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातल्याची बातमी पुढे आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.