पुणे – रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरु असताना एमएनजीएल गॅसची पाईपलाईन फुटली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. ही घटना कोंढवा खुर्द, पारगे नगर परिसरात मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
सविस्तर माहिती अशी की, कोंढवा खुर्द, पारगे नगर येथे आज (दि. 28) दुपारी अडीच वाजता अग्निशमन दलाकडे रस्यावरील एमएनजीएल गॅसची पाईपलाईन फुटल्याने भीषण आग लागल्याची वर्दि मिळताच कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.
Video: पुण्यात JCBने खोदकाम करताना गॅस पाईपलाईन फुटली; जमिनीतून निघत होत्या आगीच्या ज्वाळा… pic.twitter.com/PE4aWoVX3W
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 28, 2023
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने खोदकाम चालू असताना सदर एमएनजीएल लाईन फुटली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली होती. जवानांनी सातत्याने आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवत एमएनजीएलचे अधिकारी यांच्याशी नियंत्रण कक्षामार्फत संपर्क साधला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व एमएनजीएलची मुख्य वाहिनीचा प्रवाह बंद करत धोका दूर केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तीस मिनिटात आग पूर्ण विझवत पुढील अनर्थ टाळला. सदर ठिकाणी कोणीही जखमी नाही.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक योगेश जगताप, फारुक शेख, अनिल खरात तसेच तांडेल सोपान कांबळे व जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, महेश फडतरे, संदिप पवार, अभिषेक कसबे, दिनेश डगळे, प्रसाद शिंदे, संदिप कवडे यांनी सहभाग घेतला.