भोर -भोर तालुक्यात पहाटेच्या वेळी गडद धुके पडत असल्याने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला-पुरुषांना रस्त्यावरून चाचपडतच मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या दाट धुक्याचा रब्बी पिकांना फायदा होत असून दवबिंदूंनी शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, भुईमूग आदी पिकांचे पानावर दवबिंदू साचत असल्याने हे दवबिंदू पिकांचे वाढीसाठी पोषक ठरत असल्याचे बळीराजा बोलत आहे. दाट धुक्यात दवबिंदू अंगावर साचत असताना दवबिंदूत भिजत नागरिक पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणात व्यायामाचा आनंद घेताना त्यांचे मन प्रफुल्लित होत असल्याचे पहायला मिळत आहे.
तालुक्यात सोमवार व मंगळवारी पहाटेच्या वेळी दाट धुक्याची झालर पसरली असल्यामुळे दाट धुक्यात वाट हरवली गेली होती. दाट धुक्यासह दव तयार झाले असताना निसर्गात प्रसन्न वातावरण तयार झाले होते. तसेच रस्त्यावरून वाहनाच्या लाईटच्या फोकसवर दाट धुके झळकताना दिसत आहे.