पिंपरी – मेट्रोच्या कामासंदर्भात आयुक्त, महापौर व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांची मंगळवारी (दि. 3) आढावा बैठक पार पडली. या वेळी मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र गावडे, निर्मला कुटे आदी उपस्थित होते. या वेळी मेट्रोचे पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी केली आहे. तसे निवेदनही त्यांनी दिले आहे.
त्यानुसार, मार्च 2018 मध्ये मेट्रो प्रकल्पात तीन मेट्रो मार्गिका आहेत. त्याची एकूण लांबी 54. 58 किलोमीटर आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना मेट्रोमुळे एक प्रभावी शहरी वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. हा प्रकल्प केवळ पुणे शहरापुरता मर्यादित नसून पिंपरी चिंचवड शहराचाही त्यामध्ये समावेश आहे. तसेच यामध्ये सरकार, राज्य सरकार, पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका यांचा अर्थिक हिस्सा आहे.
सध्या मेट्रो प्रकल्पाच्या पुणे मेट्रो या नावात केवळ पुणे शहराचा नामोल्लेख दिसून येतो. त्त्यामध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करून पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो असे नामकरण करण्यात यावे. तसेच मेट्रोचा निगडीपर्यंत मार्ग वाढविण्यात यावा अशी मागणी महापौर ढोरे यांनी केली आहे.