महापुरूषांची छायाचित्रे अडगळीत पडल्याने संताप
सातारा – मागासवर्गीय समाजकल्याण सभापती संगीता आवळे यांच्या दालनाचा वापर होत नसल्याने हे दालन भंगार वस्तूंचे अडगळीचे केंद्र बनले आहे. या दालनात सभापतीच उपलब्ध नसल्याने या दालनाला अवकळा प्राप्त झाली आहे. सातारा पालिकेत बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, नियोजन व महिला बालकल्याण या पाच विभागातून त्या त्या सभापतींचे कामकाज चालते.
या साऱ्याला अपवाद फक्त मागासवर्गीय समाज कल्याण सभापती संगीता आवळे यांचे दालन आहे. या दालनात येऊन बसण्याचा रिवाज समाजकल्याण सभापतींकडून पाळला जात नसल्याने हे दालन म्हणजे पालिकेत येणाऱ्या रिकामटेकड्यांच्या राजकीय गप्पा व टाकाऊ वस्तूंचे आगार बनले आहे. सभापतींच्या दालनात दोन तुटलेली कपाटे व एक पाय मोडलेली खुर्ची ठेवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी धान्य कपडे इतर तत्सम वस्तू समाजकल्याण सभापतींच्या दालनात दोन महिने पडून होत्या. धान्याची ती मदत पाठवायला हवी होती ती मदत प्रत्यक्षात पोहचलीच नाही. त्या पोत्यातील धान्यांना किडे लागण्याची वेळ आली होती. नंतर समाजकल्याण सभापतींचे केबिन अद्ययावत करावयाचे आहे असे सांगून ते बरेच दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
या दालनाच्या भिंतींचा रंग उडालेला असून जमिनीचे कारपेट उखडले आहे. केबिनची वातानुकूलन यंत्रणा नादुरुस्त असून सभापतींची खुर्ची सुध्दा मोडकळीस आली आहे. सध्या मोडकळीस आलेली कपाटे, मोडक्या खुर्चा, यामुळे दालनाचे रुपडे कधी पालटणार याची सभापतींना प्रतीक्षा आहे. सोमवारी कधी नव्हे सभापती संगीता आवळे आपल्या केबिनला हजर झाल्या. त्यावेळी नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक या त्यांना भेटायला आल्या, तेव्हा दालनात बसण्यासाठी खुर्च्याच नव्हत्या, त्या शिपायाला बोलून मागवाव्या लागल्या. त्यामुळे समाजकल्याण सभापतींच्या दालनाचा वनवास कधी संपणार हे समजायला मार्ग नाही.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व हरियाणाचे माजी राज्यपाल गणपतराव तपासे यांची छायाचित्रे दालनाच्या एका कोनाड्यात उलटी करुन ठेवण्यात आली आहेत. पालिकेची ही अनास्था म्हणजे नव्या वादाला निमंत्रण देणारी ठरू शकते. मात्र कोणत्याही जबाबदार पदाधिकाऱ्याचे लक्ष नाही. सभापतींनी वारंवार सूचना करूनही भंगारात पडलेले फर्निचर अद्याप हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे दालनाच्या मरणकळा अद्याप संपलेल्या नाहीत.