कार्ला – राज्य सरकारने आश्वासन दिल्याच्या 40 दिवसानंतर देखील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणा संदर्भात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. या आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यासाठी मावळ तालुक्यासह लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार (दि. 28) पासून चक्री उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला विविध संस्था, संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.
हे चक्री उपोषण असून लोणावळा शहर व ग्रामीण भागातील गावातील मराठा समाजाचे तरुण उपोषणाला बसणार आहे. शनिवारी उपोषणाच्या पहिल्या दिवशी कार्ला, टाकवे खुर्द, केवरे, डोंगरगाव या गावातील तरुण उपोषणाला बसले आहेत. पुढील काळात लोणावळा शहर व ग्रामीणच्या 38 गावातील तरुण तर एक एक दिवस महिला भगिनी देखील उपोषणाला बसणार आहेत.
दररोज सायंकाळी परिसरातील सांप्रादायिक क्षेत्रातील प्रवचनकार प्रवचनरुपी सेवा तसेच हरिजागर करणार आहे. कार्ला येथे मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या चक्री उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक सामाजिक संघटना तसेच महिला भगिनींनी या ठिकाणी उपस्थिती लावत पाठिंबा दर्शवत आहेत.
पारनेरचे आमदार निलेश लंके व त्यांचे पाच हजार भाविक एकविरादेवी दर्शनासाठी आले असता उपोषणाला पाठींबा दिला. तसेच त्यांनी आणलेल्या भाविकांच्या वाहनांनवरील राजकीय पोस्टर सकल मराठा समाजाकडून काढण्यात आले.