शेवगाव – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे तालुक्यातही पडसाद उमटत असून, तालुक्यातील खाम पिंपरी येथील लक्ष्मण दसपुते या युवकाने तीन दिवसांपासून गावात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात काही युवक रोज साखळी आंदोलनाच्या माध्यमातून त्यात सहभागी होत आहेत.
या आंदोलनात आज (शनिवार) भक्तराज दसपुते, गणेश दसपुते, आकाश डोंगरे आदींसह युवक सहभागी झाले होते. “आता नाही तर कधीच नाही’, अशा निर्धाराने परिसरातील युवकांचा त्यास प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तहसीलदार प्रशांत सांगडे यांनीही आंदोलनाची दखल घेत तलाठी, ग्रामसेवक यांनी दक्ष राहून रोजच्या रोज आंदोलनाबाबतचा लेखी अहवाल देण्याच्या सूचना दिल्या.
काल (शुक्रवार)पासून भातकुडगाव फाट्यावर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस असून, आज (शनिवार) माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा आरक्षणाबाबत सरकारने विनाविलंब निर्णय घेण्याची मागणी केली.