सणबूर -पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावातील नळ पाणीपुरवठा योजना कालबाहय झाल्याने या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. विशेषत: या गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या गावांतील ग्रामस्थांनी नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याची मागणी श्री. देसाई यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री देसाई यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या या गावांचा जलजीवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश केला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिफारशी करून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती देसाई यांच्या कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
बेलदरे, म्होप्रे, गिरेवाडी, आडदेव, साबळेवाडी, वाडीकोतावडे, खळे,नवसरवाडी, नाडोली, माजगाव, वेताळवाडी व त्रिपुडी या गावांमध्ये नवीन नळ पाणीपुरवठा योजना होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे विनंती केली होती. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये बेलदरे 45.15 लाख, म्होप्रे 177.41 लाख, गिरेवाडी 82.04 लाख, आडदेव बु व आडदेव खुर्द 188.65 लाख, साबळेवाडी 86.37 लाख, वाडीकोतावडे 53.83 लाख, खळे 98.77 लाख, नवसरवाडी 89.91 लाख, नाडोली 80.48 लाख, माजगाव 115.14 लाख, वेताळवाडी 120.75 लाख व त्रिपुडी 87.13 लाख या योजनांचा समावेश आहे. मंजूर योजनांच्या निविदा प्रक्रिया कार्यवाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुरु केली आहे. निविदा निश्चित झाल्यानंतर या योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहिती या प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.