नवी दिल्ली -कॉंग्रेसने बुधवारी अचानकपणे छत्तिसगढच्या उपमुख्यमंत्रिपदी त्या राज्याचे मंत्री टी.एस.सिंहदेव यांची वर्णी लावली. त्या राज्यात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी सिंहदेव यांना उपमुख्यमंत्रिपद भुषवता येणार आहे.
छत्तिसगढमधील मागील निवडणुकीत (वर्ष 2018) बाजी मारून कॉंग्रेसने अनेक वर्षांच्या सत्तेवरून भाजपला दूर केले. त्यानंतर त्या राज्याची धुरा सांभाळण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि सिंहदेव यांचीच नावे चर्चेत होती. दोन्ही नेते प्रभावशाली असल्याने त्यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवण्याचा फॉर्म्युला कॉंग्रेसने निश्चित केल्याची चर्चा सातत्याने रंगली. बघेल यांचा निम्मा कार्यकाळ संपल्यानंतर सिंहदेव यांनी कथित फॉर्म्युल्याची आठवण करून दिली.
अनेकदा त्यांची नाराजीही उघड होत राहिली. पण, त्यांनी कुठले टोकाचे पाऊल उचलले नाही. संयम राखल्याचे फळ त्यांना आता उपमुख्यमंत्रिपदाच्या रूपाने मिळाल्याचे मानले जात आहे. त्याशिवाय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर छत्तिसगढ कॉंग्रेसमध्ये दुही निर्माण होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी दक्षतेचे पाऊल उचलल्याचेही बोलले जात आहे.