गाझा सिटी, (गाझा पट्टा) – इस्रायल आणि गाझा यांच्या दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला थांबवण्यासाठी काल रात्रीपासून युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र सोमवारी सकाळी पुन्हा संघर्षाची शक्यता कमी असणार असे संकेत मिळायला लागले आहेत.
गेल्या वर्षी इस्रायल आणि गाझाच्या हमास दरम्यान तब्बल 11 दिवस जोरदार लढाई झाली होती. इस्रायलने केलेल्या जोरदार रॉकेट माऱ्यामुळे गाझामधील शहरांची अपरिमित हानी झाली होती.
शुक्रवारपासून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली होता. तर दुसरीकडे इराण धार्जिण्या पॅलेस्टिनी जिहादी दहशतवाद्यांनीही इस्रायलवर शेकडो रॉकेट डागली आहेत. गेल्या 3 दिवसांच्या लढाईदरम्यान पॅलेस्टाईनचे एकूण 43 जण ठार झाले आहेत. त्यामध्ये 15 मुले आणि 4 महिलांचाही समावेश आहे. तर 311 जण जखमी झाले आहेत, असे पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. ठार झालेल्यांपैकी काही जणांचा मृत्यू दिशा भरकटलेल्या रॉकेटमुळे झाला आहे.
इस्रायलने मानवतावादी कारणासाठी गाझा सीमा अंशतः उघडणार असल्याचे म्हटले आहे. सीमेवर शांतता असल्यास ही सीमा पूर्ण उघडली जाईल, असेही म्हटले आहे. इस्लामिक जिहादच्या नेत्याला अटक केल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून हिंसाचार होण्याच्या शक्यतेने इस्रायलने गाझाविरोधात जोरदार कारवाई केली होती.