नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणात कॉंग्रेसने देशभर आंदोलन सुरू केले असून याच आंदोलनादरम्यान कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधऱी यांनी पोलिसाची कॉलर पकडल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलन करत असताना एका क्षणी त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली.
त्यानंतर रेणुका चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम 151, 140, 147, 149, 341 आणि 353 नुसार हे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. आंदोलन करत असताना पोलिसांच्या गराड्यात आपण संघर्ष करत होतो. यावेळी आपणास पोलीस मागे ढकलत होते. मागे जाताना आपला पाय अडकून आपण खाली पडणार होतो.
त्यामुळे तोल सावरण्यासाठी आपण समोर असणाऱ्या पोलिसाचा आधार घेतला, असे चौधरी यांनी म्हटले आहे. तो एक तरुण पोलीस कर्मचारी होता आणि तो मला ढकलतही नव्हता. तो त्याचे कर्तव्य बजावत होता. मात्र एका क्षणी माझा पाय अडकल्यामुळे मी खाली पडणार होते. स्वतःला सावरण्यासाठी त्यावेळी पोलिसाची कॉलर पकडावी लागली, असे त्या म्हणाल्या.
पोलिसाची कॉलर नाईलाजाने पकडावी लागली, त्यामागे इतर कुठलाही हेतू नव्हता, आपण त्या तरुण कर्मचाऱ्याची माफी मागायला तयार आहोत, मात्र त्याचवेळी आपल्यावर नाहक दादागिरी करणाऱ्या पोलिसांनी आपली माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्याभोवती पुरुष पोलिसांचा एवढा प्रचंड गराडा का घालण्यात आला होता, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे, अशी मागणीही रेणुका चौधरी यांनी केली आहे.