कीव्ह – फ्रान्स, जर्मनी, इटली आणि रोमानिया या देशांच्या नेत्यांनी युक्रेनला युरोपियन युनियनचा सदस्य करून घेण्यास पाठिंबा दिला असून, “तातडीने’ युक्रेनला सदस्याचा दर्जा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कीव्हमध्ये संयुक्त परिषदेत ते बोलत होते. जर्मन चॅन्सेलर ओलाफ शॉल्झ म्हणाले, “युक्रेन युरोपियन कुटुंबाअंतर्गत येते. तसेच युक्रेनने युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी आवश्यक अटींची पूर्तताही तातडीने पूर्ण करायला हवी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या मुद्द्यावर जोर दिला की, 27 सदस्यांची युरोपियन युनियन रशियाविरोधातील युद्ध युक्रेन जिंकत नाही, तोवर युक्रेनच्या मागे खंबीरपणे उभी राहील.
यावेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला की, रशियाची युक्रेनमधील घुसखोरी ही “संयुक्त युरोपविरोधातील युद्ध’ आहे. रशियाविरोधात लढण्यासाठीचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे एकजूट असल्याचे ते म्हणाले.