दहा वर्षांनी भरले आंधळी धरण 

पावसामुळे माणवासीय सुखावले, माणगंगेलाही पूर
गोंदवले –
नेहमीच दुष्काळी म्हणून गणलेला गेलेला माण तालुका परतीच्या पावसाने चांगलाच सुखावला आहे. सध्या माण तालुक्‍यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या तुडुंब भरुन वाहत असून माणगंगेलाही पूर आला आहे. विशेष म्हणजे जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील आंधळी धरणही कधीनव्हे ते पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने जोर धरला आहे. विशेष म्हणजे दुष्काळी माण तालुक्‍यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे.

माण तालुक्‍यातील आंधळी धरण क्षेत्रासह मुसळधार पावसाने संपुर्ण माणला अक्षरशः झोडपून काढले आहे. आंधळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने माणगंगेला पुर आला व धरण रात्रीच भरुन वाहिले. सांडव्यावरून वाहत असलेल्या पाण्याने धरणाच्या खालील बाजुला माणगंगेला प्रथमच मोठा पुर आला आहे. माणगंगा नदीवरील बिदाल-बोराटवाडी रस्त्यावरील पुल प्रथमच पाण्याखाली गेले आहेत. नदी दुथडी भरुन वाहिल्याचा आनंद माणदेशी जनतेच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. माणगंगेचा महापूर पाहण्यासाठी सर्वांनीच नदीकडे धाव घेतली होती. विशेषतः नदीकडे येणारी प्रत्येक महिला भक्तीभावाने नदीची ओटी भरत होत्या.

या मुसळधार पावसाने व महापुराने काही ठिकाणी मोठे नुकसान केले. आंधळी गावालगत माणगंगा नदी किनारी असलेल्या माण तालुक्‍यातील मोठ्या स्मशानभूमीत (कैलासधाम) पुराचे पाणी घुसल्याने स्मशानभूमीचे नुकसान झाले आहे. गाडेवाडी येथील तलावातून आलेले पाणी शेतात घुसल्याने शेतीचेही प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी सिमेंट बंधाऱ्याच्या हौद्याचे बिम वाहून गेले आहेत. सिमेंट बंधाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. गोंदवले येथे सकाळी माण नदीला अचानक आलेल्या महापुराने गोंदवले बुद्रुक येथील पूल पाण्याखाली गेला.त्यामुळे वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला.

सकाळी नऊच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील माण नदी पत्रात अचानक पाणी वाढले. परिसरातील नदीवरील बंधारे यापूर्वीच भरले असल्याने वरच्या भागातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे काही मिनिटातच संपूर्ण नदीपत्राचा ताबा घेतला. त्यामुळे कवटवस्ती, बनवडा, इनामवस्ती या भागाचा गावाशी संपर्क तुटला. गावातून नदी पलीकडे रानात गेलेले व वस्त्यावरून गावात आलेले लोक अडकून पडले. गोंदवले खुर्द येथेही नदीला पूर आल्याने नदीपालिकडे असलेल्या वस्त्याशी संपर्क तुटला. गावातून नदीपार करूनच शाळेला जावे लागत असल्याने शाळेलाही आज सुट्टी देण्यात आली होती. दहा वर्षानंतर नदीला पूर आल्याने लोकांनी पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गोंदवले खुर्द येतील पाण्याच्या प्रवाहामुळे स्मशानभूमीत पाणी शिरल्याने भिंत कोसळून नुकसान झाले.

दरम्यान, नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसण्याची सवय पडलेल्या माणवासियांमध्ये सध्या सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे माण तालुक्‍यातील बंधारे, नद्या भरुन वाहत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी नदी काठावर दोन्ही बाजुला ग्रामस्थ गर्दी करत आहे. तसेच वरुणराजाला धन्यवाद देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.