कराडमध्ये उत्कंठा शिगेला!

सुरेश डुबल
कराड  – सोमवारी विधानसभेचे मतदान अखेर पार पडल्याने उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. आता गुरुवार, 24 रोजी निवडणुकांचा निकाल हाती येणार आहे. तत्पूर्वी कराड उत्तर व दक्षिणमधील कार्यकर्त्यांसह नेत्यांची उत्कंठा शिगेला लागली असून, जो तो आपल्याच विजयाची हमी देत आहे. मात्र यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्रातील लक्षवेधी लढत म्हणून कराड दक्षिणकडे पाहिले जाते. सोमवार, दि. 21 रोजी झालेल्या मतदानामध्ये सरासरी 70 टक्के एवढे मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत कराड दक्षिण मधील मतदानाचा टक्का वाढलेला दिसला. त्यामुळे हा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरले आहे. कराड दक्षिणेत निवडणुकीसाठी तेरा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी पंजाबराव पाटील व अमोल साठे या दोन उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र खरी लढत आ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले आणि उदय पाटील या तिघांमध्ये झाली. मात्र या तिघांमध्ये कोण सरस ठरणार यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक आहे.

कराड उत्तरकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. येथे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सलग चार वेळा निवडणूक जिंकली आहे. यंदा या मतदारसंघात सहा जणांनी उमेदवारी अर्ज भरला असून, आ. बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम या तिघांमध्ये प्रमुख लढत झाली. येथेही साधारणत: 70 टक्के एवढे मतदान झाले आहे. मागील निवडणुकीची अवस्था पाहता तिरंगी लढतीचा आ. बाळासाहेब पाटील यांना फायदा झाला होता. यंदाही याठिकाणी घोरपडे यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. कराड उत्तरमध्ये आम्हीच बाजी मारणार, असे या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांची खात्री आहे. मात्र येथे आमदार बाळासाहेब पाटील यांचे पारडे काही प्रमाणात सरस असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

एकंदरीत कराड दक्षिण व उत्तरमध्ये झालेल्या मतदानातून मतदानाचा टक्का वाढता दिसत आहे. त्यामुळे ज्या त्या कार्यकर्त्यांकडून आपला नेताच विजयी होणार असल्याचे स्पष्ट केले जात आहे. काही टीव्ही चॅनेल्सनी अतुल भोसले यांना आघाडीवर दाखवले आहे. तर काही चॅनेल आमदार पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीवर आहेत, अशाप्रकारे एक्‍झिट पोल दर्शवत आहेत. त्यामुळे कराड उत्तरपेक्षा दक्षिण मधील लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.